Header Ads

ad728
  • Breaking News

    रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीमुळे तालुक्यात आनंदोत्सव

    अकलूज (प्रतिनिधी )विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव, युवक नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिल्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

    माळशिरस विधानसभा, माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला दणदणीत विजय मिळवून देणाऱ्या मोहिते-पाटील यांना कधी न्याय मिळणार, अशी चर्चा सुरू होती. रणजितसिंह यांच्या उमेदवारीच्या रूपाने मोहिते-पाटील घराण्याला भाजपने अखेर न्याय दिला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

    सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ सोडून संपूर्ण मोहिते-पाटील परिवाराला भाजपची साथ सोबत करायला भाग पाडले होते.

    रणजितसिंह मोहिते-पाटील हे युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी तालुका पातळीपर्यंत किमान आठ ते दहा वेळा दौरा करून पक्षाची बांधणी केली होती. संपूर्ण राज्यात त्यांचा चाहतावर्ग आहे. हे लक्षात घेऊन व सहकार क्षेत्रातील मोहिते-पाटील परिवाराचे काम पाहून भाजपने त्यांचा सन्मान केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

    माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार मोठ्या फरकाने विजय करण्यात मोहिते-पाटील कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघ त्यांनी भाजपकडे खेचून आणला आहे. विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात भाजपच्या दृष्टीने अनेक कार्यकर्त्यांचे मतपरिवर्तन केले होते.

    गेली 10 वर्षे मोहिते-पाटील कुटुंबातील व्यक्ती विधानसभा, विधान परिषदेत कार्यरत नव्हती. त्यामुळे आता विजयसिंह यांच्याप्रमाणेच रणजितसिंह यांच्याकडूनही लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण माळशिरस तालुक्‍यात व सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. 

    ग्रामीण आणि सहकारातील चेहरा 
    तब्बल 10 वर्षांनंतर मोहिते-पाटील कुटुंब राज्यातील राजकारणात पुन्हा नव्या जोमाने सक्रिय होणार आहेत. भाजप संघटना बांधणीसाठी त्यांचा उपयोग करून घेईल, यात शंका नाही. ग्रामीण व सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा चेहरा म्हणून मोहिते-पाटील यांच्याकडे पाहिले जाते. (कै.) वसंतदादा पाटील, सहकारमहर्षी (कै.) शंकरराव मोहिते-पाटील यांच्या गटाला भाजपने राजकीय ताकद दिल्याचे या निवडीने स्पष्ट झाले आहे.                                         रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर माळशिरस तालुक्यातील अनेक चाहत्यांनी मिठाई वाटून आनंदोस्तव साजरा केला, सोशल मीडिया वर तर दोन दिवसापासून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.         गेल्या कित्येक वर्षापासून मोहिते पाटील गट हा सत्ते पासून दूर होता, परंतु असे असले तरी त्यांनी समाजकारण सोडले नव्हते, ते नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. त्यांची निवड जवळजवळ निश्चित असल्याचे जाणकार वर्गातुन बोलले जात आहे.                        चौकट :- रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपा च्या वतीने विधानपरिषद ची उमेदवारी दिल्यानंतर या संदर्भात माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांना संपर्क साधला असता, ते म्हणाले की रणजितदादा यांच्या निवडीमुळे माळशिरस तालुक्याच्या विकासाला निश्चितपणे गती मिळेल. तसेच माळशिरस तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, आपण रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

    No comments